विशेष उपक्रम
‘बाल प्रबोधिनी’ संस्थेची स्थापना
मधल्या काळात गुणांच्या चुरशीमुळे शालेय विद्यार्थी निराशेकडे वळल्याचे अनेक किस्से ऐकिवात येत होते. या मुलांच्या मनाला उभारी देणं अत्यंत गरजेचं होतं.
श्रीयुत चंद्रकांत ठाकूरदास यांनी ‘मन’ या विषयावर ३६ वर्षे संशोधन केलं. ‘तणावमुक्त जीवन’ कसं जगता येईल याचं मार्गदर्शन विवेचना मार्फत केलं. अनेक प्रौढ व्यक्तींनी याचा त्यांना फायदा झाल्याचे व्यक्त केले. त्यामुळे मुलांपर्यंत योग्य वेळी, हसत खेळत योग्य विचार आणि संस्कार पोहोचवले तर त्यांचा शैक्षणिक विकास साधता येईल आणि त्यांची मजल निराशेपर्यंत जाणार नाही याची त्यांना खात्री होती. कारण गुणांच्या मागे धावताना मुलांची अभ्यासाची गोडी कुठेतरी हरवली असल्याचं भाऊंना जाणवलं. त्यासाठी ‘मुलांच्या मनात शिरा आणि त्यानं आपलंसं करा’ हा त्यांचा मूलमंत्र. याच आधारावर त्यांनी ‘अध्ययन कौशल्य’ या अभ्यासक्रमाची आखणी केली. हा अभ्यासक्रम इयत्ता सातवीच्या मुलांना, म्हणजेच पौगंडावस्थेत असलेल्या मुलांसाठी घेतला जातो. कारण या वयात त्यांची शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक पातळीवर वाढ होत असते आणि ज्ञानग्राहणाची क्षमताही जास्त असते. अशा प्रकारे ‘बाल प्रबोधिनी’ या नोंदणीकृत संस्थेची स्थापना २००९ साली झाली.
‘अध्ययन कौशल्य’ अभ्यासक्रम
नियोजन, एकाग्रता, श्रवण, वाचन आणि लेखन ही पंचसूत्री या अभ्यासक्रमातून दिली जाते. विविध प्रयोग, प्रतिकृती, कृतीत्मक सहभाग, चार्टस, उद्बोधक खेळ या माध्यमातून मार्मिक आणि रंजकता पूर्ण पध्दतीने मार्गदर्शन केले जाते. यात कोणत्याही शालेय विषयाचा उल्लेख नाही. त्यामुळे हा उपक्रम राज्य, केंद्र, IB, ICSE किंवा CBSE वा इतर कोणत्याही बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पूरक ठरतो. हा उपक्रम शाळांमधून स्वयंसेवी शिक्षक आठवड्यातून एकदा घेतात.
स्वयंसेवी शिक्षक हे व्यवसायाने शिक्षक असण्याची गरज नाही, त्यांची मनात फक्त मुलाच्या भवितव्याची तळमळ तेवढी पुरेशी आहे. कारण बाल प्रबोधिनीचं उद्दिष्ट आहे ‘ आपल्याला भावी पिढी घडवायची आहे.’
‘बाल प्रबोधिनी’ ची वाटचाल
२००९ सालात, पहिल्या वर्षी ‘बाल प्रबोधिनी’ तर्फे ५ स्वयंसेवी शिक्षकांनी मराठी माध्यमातील ५ शाळामधून हा अभ्यासक्रम २५० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. आजमितीपर्यंत अनेक शिक्षकांमार्फत अनेक शाळांमधून हा उपक्रम मराठी आणि इंग्रजी माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईतील शहरे आणि उपनगरे, पुणे, गोवा आणि कोंकण विभागातील मुलांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे.


शैक्षणिक विकास
शिक्षकांची मानसिकता घडविणे
बाल प्रबोधिनी संस्था ' शिक्षक ' या पेशाकडे अतिशय वेगळ्या नजरेने पहाते. पदवीधर प्रशिक्षित व्यक्ती ही शिक्षक म्हणून शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असतेच. पण बाल प्रबोधिनीची प्रशिक्षित शिक्षक असलेली व्यक्ती ही विशिष्ट मानसिकता बाळगते.
कोण सहभागी होऊ शकतो?
हे प्रशिक्षण घेण्यासाठी एकच महत्त्वाची अर्हता असते आणि ती म्हणजे ' मुलांविषयीची तळमळ '.या शिक्षकांना कोणताही पाठ्यपुस्तकातील विषय शिकवायचा नसतो. मात्र तो विषय विद्यार्थ्यांनी कसा शिकावा? हेच शिकायला शिकवणारे शिक्षक बाल प्रबोधिनीत तयार होतात. कार्यरत असलेले हे स्वयंसेवी शिक्षक समाजातील विविध क्षेत्रांतून आलेले आहेत. वकील, आयटी इंजिनिअर, CA, प्राध्यापक, शिक्षक, क्रीडा, अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले आणि त्याच बरोबर अगदी गृहिणी सुध्दा स्वयंसेवी शिक्षक म्हणून इथे प्रशिक्षण घेऊन शाळांमध्ये कार्यरत आहेत.
प्रशिक्षण घेण्यासाठी मानसिकता
हे प्रशिक्षण संपूर्णपणे नि:शुल्क तत्वावर दिलं जातं. उपक्रमातील विविध शैक्षणिक सूत्रांवर आधारित १५ सत्रांचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षणार्थींचा कृतीत्मक सहभाग घेऊनच सखोल मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक शैक्षणिक सूत्रामागे असलेली वैचारिक बैठक, त्यातून साधला जाणारा परिणाम आणि त्यामुळे शिक्षणाविषयी तयार होणारी विद्यार्थ्यांची नजर याचं सुस्पष्ट चित्र प्रशिक्षणार्थींच्या मनात तयार होतं. या प्रशिक्षणाचं आगळे पण त्यांना भावतं. आणि ही सामाजिक बांधिलकी स्वीकारून त्यातील आनंद अनुभवण्याकरिता उत्सूक होतात. हेच या प्रशिक्षणातील कार्यशाळेचे आगळे पण आहे. इथे विद्यार्थ्यांच्या आधी शिक्षक घडतात. किंबहुना स्वतः ला घडवतात आणि विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी मार्गक्रमण करू लागतात. " आपल्याला भावी पिढी घडवायची आहे. " हे संस्थेचे बोधवाक्य हे त्यांचं ध्येय बनतं.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे स्वरूप आणि टप्पे
हे प्रशिक्षण सलग सहा तास या पध्दतीने दोन दिवस संस्थेच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत दिलं जातं. प्रशिक्षणार्थींच्या मनापर्यंत ते नेमकं कितपत पोचलं आहे हे जाणून घेण्यासाठी संस्थेचे तज्ज्ञ मार्गदर्शक दोन दिवस डेमोचे अवलोकन करतात. डेमो लेसन मधील त्रुटी दूर करतात. अशा प्रकारे चार दिवस आंतरक्रियात्मक प्रशिक्षण पूर्ण झालं की पाचव्या दिवशी विविध विषयांमधील सूक्ष्म बारकावे दाखवून दिले जातात. शाळेत मुलांशी, संबंधित शालेय शिक्षकांशी, मुख्याध्यापकांशी सौहार्दाचे संबंध निर्माण करण्याची आचारसंहिता सुस्पष्ट पणे मांडली जाते. हे सर्व सुनियोजित स्वरूपात घेण्यासाठी आणि अर्थातच प्रशिक्षणार्थींच्या वैयक्तिक व्यस्ततेचा विचार करून साधारणपणे सुट्टी चे पाच दिवस ( शनिवार/ रविवार/ सार्वजनिक सुट्टी) निवडले जातात.
शैक्षणिक साहित्य
प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवी शिक्षकांना शैक्षणिक साहित्य संचाचे नि:शुल्क वाटप करण्यात येते. यामध्ये रंगित आकर्षक तक्ते, प्रतिकृती, काही हॅनडाउट्स, शैक्षणिक खेळ साहित्य, बाल प्रबोधिनी लोगो असलेली शोल्डर बॅग, अभ्यासक्रम पुस्तिका, चाॅक डस्टर इत्यादी गोष्टी समाविष्ट असतात.
शिक्षक गौरव
एक संपूर्ण शैक्षणिक वर्षात शिक्षकांनी संस्थेने आखून दिलेल्या चौकटीत उपक्रमातील पंधरा तासिका यशस्वीपणे घेतल्या की मगच त्या व्यक्तीला " बाल प्रबोधिनीचा /ची स्वयंपूर्ण शिक्षक " म्हणून मान्यता दिली जाते. आणि बाल प्रबोधिनी च्या वार्षिक स्नेह संमेलनात प्रशस्तीपत्र देऊन तिला गौरविण्यात येते.
इयत्ता १० वी शिबीर शिक्षक प्रशिक्षण
जे प्रशिक्षक उत्तम त-हेने इयत्ता ७वीचा उपक्रम शाळेत घेऊन अनुभवी झाले आहेत, ज्यांनी त्या उपक्रमातील मूल्यांचे महत्त्व जाणले आहे आणि ज्यांना त्याही पुढील टप्प्यावर जाऊन विद्यार्थ्यांसाठी काही करण्याची तळमळ आहे अशांना बाल प्रबोधिनी इयत्ता १० वीचा शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम घेण्याचे दोन दिवसीय विनामूल्य प्रशिक्षण देते. २०११ पासून २०२४ पर्यंत पूणे,मुंबई, सातारा, कोकण अशा अनेक ठिकाणी ही शिबिरे आयोजित केली गेली आणि विद्यार्थ्यांना ती खूपच लाभदायक ठरली आहेत.
स्वयंसेवी शिक्षक प्रशिक्षण
इयत्ता १० वी शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबीर संबंधित
आजचा १० वीचा विद्यार्थी हा उद्याची एक स्वतंत्र व्यक्ती आहे. असंख्य क्षेत्रांमध्ये उपलब्ध संधी आणि आवड असलेल्या क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी स्वतःला सिद्ध करणं या दोन गोष्टींची योग्य सांगड घालणं हे त्याच्या पुढे एक आव्हान आहे. त्यासाठी त्याला स्वतःच्या क्षमता आणि उणीवा यांची ओळख होणं, ध्येय ठरविणं आणि त्यानुसार योग्य निर्णय घेणं, तणाव मुक्त होऊन त्याने स्वतःला घडवणं ही काळाची गरज आहे. बाल प्रबोधिनीने यासाठी एक स्वतंत्र उपक्रम दोन दिवसीय शिबिरांत घेण्यास सुरुवात केली. या उपक्रमात परिणामकारक शैक्षणिक साहित्य, मार्मिक खेळ, आकर्षक तक्ते यांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत प्रत्येक विषय पोचविला जातो. आयुष्याच्या दृष्टीने श्रेयस आणि प्रेरक काय आहे हे समजण्याची एक निश्चित नजर शाळेचा उंबरठा ओलांडून नवीन जगात प्रवेश करताना त्यांना प्राप्त होते.
शिबिरांचे प्रयोजन
बाल प्रबोधिनी संस्थेने इयत्ता सातवी चे शैक्षणिक विकासाचे नियमित शालेय वर्ग घेण्यास २००९ पासून प्रारंभ केला आणि त्या अल्पावधीतच विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांची दाद मिळाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मानसिकतेमध्ये घडून आलेला आमूलाग्र बदल सर्वांनाच जाणवला.
जेव्हा हे विद्यार्थी इयत्ता १० वीच्या उंबरठ्यापर्यंत पोचले तेव्हा संस्थेला प्रकर्षाने जाणवलं की आता विद्यार्थी शाळेचं अंगण सोडून महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेश करतील तेव्हा बाल प्रबोधिनीच्या संस्कारांची आणि विचारांची शिदोरी त्यांच्यापाशी असण्याची नितांत गरज आहे. कारण याच संवेदनशील वळणावर अनेक प्रलोभनांच्या विळख्यात सापडण्याची शक्यता दुणावते. आणि या टप्प्यावर विद्यार्थी जर चुकीच्या दिशेने वळला तर पुन्हा परतणं दुरापास्त होतं. म्हणून शाळेचं अंगण ओलांडण्यापूर्वीच विद्यार्थी सजग व्हायला हवेत. त्यासाठी मनावर केलेल्या सखोल संशोधनाच्या पायावर आधारित श्रीयुत चंद्रकांत ठाकूरदास म्हणजेच परमपूज्य भाऊ यांनी " शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकास " हा एक अनोखा उपक्रम तयार केला.
मार्गदर्शन कशाचे
इयत्ता १०वी नंतर विविध शैक्षणिक शाखांची, संबंधित विषयांची निवड करताना विद्यार्थी संभ्रमात असतात. याला मुख्य कारण म्हणजे स्वतःविषयी अनभिज्ञ असतात. स्वतः च्या क्षमता आणि मर्यादा ओळखता याव्यात यासाठी ' स्वतः ची ओळख हे सत्र शिबिरात घेतलं जातं. केवळ भविष्याची स्वप्न रंगवून जीवन यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी योग्य त-हेने नियोजन करून ध्येय निश्चित करावं लागतं आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी विविध टप्प्यावर निर्णय घेण्याची क्षमता सुध्दा अंगी बाणवावी लागते यांची स्पष्ट जाणीव आणि मार्गदर्शन सुध्दा केलं जातं. किशोर अवस्था आणि युवावस्था या दोन्ही महत्त्वाच्या टप्प्यावर बहुतांशी विद्यार्थी पालकांपासून मनाने दूर जातात. अशा वेळी योग्य संगत मिळाली तर योग्य मार्गावर वाटचाल सुरू होते. अन्यथा आयुष्य भलत्याच वळणावर पोहोचतं. विद्यार्थ्यांनी कौटुंबिक विश्व आणि मित्र जगत यांची योग्य सांगड घालावी यासाठी ' आपापले जग' या अतिशय संवेदनशील सत्राचे आयोजन देखील शिबिरात केले जाते.
या उपक्रमाच्या अंतर्गत विविध शाळांमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसीय शिबिरांचं आयोजन संस्थेने करायला सुरुवात केली. आणि शाळेच्या माध्यमिक वर्गाच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी ह्या उपक्रमाला अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजमितीपर्यंत ( संख्या) शाळांमध्ये (संख्या) विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. या शिबिरातून त्यांना आपल्या शैक्षणिक भवितव्याची, भावी आयुष्यात ध्येयाप्रत पोचण्यासाठी आवश्यक असलेली निश्चित नजर प्राप्त होते. आपल्या क्षमता आणि मर्यादा जाणण्याचा, तणावमुक्त होऊन आव्हानांना सामोरं जाण्याचा दृष्टिकोन प्राप्त होतो.
अशी शिबीरं मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमधील आणि उपनगरातीलशाळांमध्ये तर आयोजित करण्यात येतातच पण त्याच बरोबरीने कोकण, गोवा येथील दूरस्थ शाळा आणि दुर्गम आदिवासी आश्रम शाळा, अनाथाश्रम शाळांमध्ये सुध्दा आयोजित केली जातात.


व्यक्तिमत्व विकास
१. सेवा सहयोग संस्थेशी संयोगात्मक कार्य
प्रयोजन
बाल प्रबोधिनीच्या कार्याचा आणि त्या अनुषंगाने पौगंडावस्थेतील मुलांच्या मानसिकतेवर होणारा सकारात्मक परिणाम जाणून " सेवा सहयोग " या संस्थेने सहकार्याची विचारणा केली. राष्ट्रीय सेवा संघाच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून या संस्थेचे स्वयंसेवी कार्यकर्ते किशोरवयीन मुलांसाठी तळमळीने कार्य गेली अनेक वर्षे करतच आहेत. तारुण्याच्या उंबरठ्यावर स्वतःची जाणीव होऊन मनाला योग्य दिशा प्राप्त व्हावी यासाठी "किशोरी /किशोर विकास कार्यक्रम " सेवा सहयोग संस्था समाजातील तळागाळापर्यंत आयोजित करते. परंतु बदलती सामाजिक परिस्थिती, डळमळीत होत चाललेली कुटुंब संस्था आणि यात विविध समाज माध्यमांचा लोंढा या सगळ्यात किशोर आणि तरूण भरकटत चालला आहे . याचा सर्वाधिक विपरित आणि दिर्घ कालीन परिणाम संवेदनशील किशोरवयीन मुलांवर होत असतो, हे आपण सारे जण अनुभवतो आहोत. सेवा सहयोग संस्थेला या पार्श्वभूमीवर बाल प्रबोधिनी उपक्रमाचा अंतर्भाव ' किशोरी विकास ' कार्यक्रमात करण्यात यावा असं प्रकर्षाने जाणवलं. बाल प्रबोधिनी आणि सेवा सहयोग या दोन संस्थांच्या सहयोगातून किशोरवयीन मुलांना सुपंथ दाखविण्यासाठी पहिलं पाऊल उचललं गेलं. या मध्ये सेवा सहयोग संस्थेच्या स्वयंसेवक चमूला बाल प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आले.
इयत्ता ६/७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम :
प्रशिक्षित स्वयंसेवकांमार्फत हा उपक्रम आदिवासी पाडे, अनाथाश्रम, मजूर वस्त्या, निम्न आर्थिक सामाजिक स्तर अशा विविध गटातील किशोरवयीन मुलांपर्यंत राबविण्यात येतो. बाल प्रबोधिनी संस्थेने त्या साठी उपक्रमाचे प्रशिक्षण आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य सेवा सहयोग संस्थेच्या स्वयंसेवकांना नि:शुल्क तत्वावर प्रदान केले.उत्तम वैचारिक बैठक आणि सामाजिक तळमळ असलेल्या दोन संस्थांच्या संयोगातून एका सत्कार्याचा शुभारंभ झाला. बाल प्रबोधिनी च्या शैक्षणिक प्रणालीच्या माध्यमातून शैक्षणिक मूल्यांचे संस्करण तळागाळातील विद्यार्थ्यांच्या मनावर केले जाते.
इयत्ता ९/१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबीर :
विविध वस्त्या, आदिवासी पाडे, कामगार निवास येथील मुले जेव्हा ९ वी /१० वी च्या टप्प्यापर्यंत पोचतात तेव्हा त्यांच्या साठी सेवा सहयोग संस्था शेकडो विद्यार्थी एकाच छताखाली एकत्र आणते. अशा विद्यार्थ्यांना बाल प्रबोधिनीच्या तज्ज्ञ स्वयंसेवक, प्रशिक्षक मार्गदर्शकांकडून 'शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकास' उपक्रमाची दोन दिवसीय शिबिरे विनामूल्य दिली जातात.
उत्तम समाज बांधणीच्या हेतूने किशोरांसाठी विशेष मार्गदर्शन :
कार्य करत असताना पाड्या वस्त्या वरील विद्यार्थ्यांचे सूक्क्षमावलोकन सेवा सहयोगचे कार्यकर्ते करत असतात. या मुलांचे भवितव्य उत्तम रितीने घडावे ही सदिच्छा त्यामागे असते. मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या जाळ्यात सापडलेल्या मनाला घातक आकर्षणं खुणावत असतात. 'प्रेम' या भावनेचा सखोल अर्थ न समजल्यामुळे सवंग प्रेमात गटांगळ्या खाणा-या किशोर आणि युवा मनाला ठोस दिशा दाखविण्यासाठी पुन्हा एकदा सेवा सहयोग संस्थेने बाल प्रबोधिनीला पाचारण केले. "आकर्षण, मैत्री आणि प्रेम" या विषयावर बाल प्रबोधिनीच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी संस्थेच्या स्वयंसेविकांना व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. आणि त्या अंतर्गत या शब्दांचा सखोल अर्थ स्वयंसेवी कार्यकर्त्याना विषद करून सांगितला गेला.
२. बी. एड. महाविद्यालय, आयरोली, नवी मुंबई येथील भावी शिक्षकांसाठी मार्गदर्शन
प्रयोजन
‘शिक्षक’ हा पेशा स्वीकारण्यापूर्वी कार्य करण्याची एक निश्चित नजर शिक्षकांना प्राप्त होणं ही काळाची गरज आहे.
समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती घडविण्याचे काम केवळ शिक्षकामार्फतच होत असते. मग समाज घडविणारा शिक्षक स्वतः आधी घडला पाहिजे. शिक्षकी पेशा हे केवळ उपजिविकेचे साधन नसून तो एक 'वसा' आहे ही मनाची बैठक तयार झाली तरच विद्यार्थी घडेल .
कार्याचे स्वरूप
या विचारातून वर उल्लेखलेल्या बी एड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सलग दोन दिवस एकाग्रता, श्रवण, वाचन, लेखन, नियोजन, निरिक्षण, शालेय विषयांचे जीवनातील महत्व अशा विविध शैक्षणिक मूल्यांवर आधारित कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्याचे फलित
महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि प्राध्यापिका यांनी स्वतः भावी शिक्षकांबरोबर कार्य शाळेतील व्याख्याने ऐकली. बाल प्रबोधिनी उपक्रमातील शिक्षणाचे संस्कार जाणून त्या खूपच प्रभावी झाल्या. "बी एड अभ्यासक्रमाच्या बरोबरीने हे विचार जर या शिक्षकांना मिळाले तर एक उत्तम वैचारिकता घेऊन हे भावी शिक्षक अभिप्रेत असलेले कार्य निश्चित करू शकतील." असा ठाम विश्वास त्यांनी कार्यशाळेची सांगता करताना व्यक्त केला. एकूण ५० भावी शिक्षकांना मार्गदर्शन आणि ५० शैक्षणिक साहित्य संचाचे वाटप नि:शुल्क तत्वावर केले गेले.
३. नवी मुंबई येथील .......... या संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बाल प्रबोधिनी संस्थेचा उपक्रम हा मनावरील मूलभूत संशोधनाच्या पायावर आधारलेला असल्याने तो सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना लाभदायक असा आहे. कोणत्याही अभ्यासक्रमात शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना एकाग्रता साधून श्रवण, वाचन आणि लेखन या शैक्षणिक पाय-या चढाव्या लागतात. वर उल्लेख केलेल्या संस्थेमध्ये काही अंध तर काही विद्यार्थी शिक्षणात मंद गती असलेले होते. पण जेव्हा त्यांनी 'नियोजन' या विषयावरील बाल प्रबोधिनी संस्थेच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी दिलेले कृती पूर्ण व्याख्यान ऐकले तेव्हा उत्स्फूर्तपणे या विषयाशी संबंधित सक्रिय भाग घेतला. उपलब्ध वेळेचा सदुपयोग केला पाहिजे आणि अपव्यय टाळला पाहिजे हे मनापासून समजून घेतलं. कुणालाही पटकन समजेल अशी भाषा, मार्मिक प्रयोग, आकर्षक शैक्षणिक साहित्य आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांची समजावून सांगण्याची शैली याचा सकारात्मक परिणाम या दिव्यांग विद्यार्थ्यांवर पण होतोय हा संस्थेसाठी खूपच आनंददायी अनुभव आहे.
४. वनवासी कल्याण आश्रम
अ) वनवासी कल्याण आश्रमाच्या चाळीस शिक्षकांसाठी बाल प्रबोधिनीचे प्रेझेंटेशन देण्यासाठी आपल्या संस्थेच्या प्रशिक्षकांना आश्रमाच्या संचालकांनी बोलावून घेतले होते. त्यासाठी पूणे स्थित आपल्या संस्थेच्या पुणे विभाग प्रमुख आणि प्रशिक्षिका श्रीमती अंजली लुकतुके आणि श्रीमती सूचेता मराठे या दोन्ही जणींची निवड केली गेली. बाल प्रबोधिनी चे अध्ययन कौशल्य विकास आणि व्यक्ती विकास हे दोन्ही उपक्रम आश्रम संचालक आणि संबंधित कार्यकर्ते यांना खूप आवडले. जमेल तसे विविध आश्रमात मुलांकरिता शिबिर घेऊया, असेही म्हणाले.
ब) भोर आणि माले ह्या ठिकाणी वनवासी कल्याण आश्रमाच्या मुलांकरता दोन दिवसीय शिबिरे आयोजित करण्यात आली. मुलं हुशार असून त्यांचा प्रतिसाद अतिशय चांगला होता. अगदी आठवणीत राहील असा हा शिबिर कार्यक्रम झाला.
५. देवडी व कोंढणपूर
देवडी व कोंढणपूर ह्या पुण्यापासून साधारण एक ते सव्वा तासांवर असलेल्या गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत ७ वी करीता २ दिवसाचे शिबीर आयोजित करण्यात आले. दोन्ही शाळांत विद्यार्थी आणि संबंधित कार्यकर्ते यांच्या कडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
६. बालगोपालन
पुण्यातील मोठ्या सोसायट्यामधील मुलांसाठी संस्कार वर्ग (राष्ट्रीय.स्व.संघाचा उपक्रम) घेतले जातात. ह्यांच्या एक दिवसीय निवासी शिबीरामध्ये ‘बालप्रबोधीनीची ओळख‘ म्हणून १२ ते १४ वयोगटातील मुलांकरता १ तास देण्यात आला होता. दोन गट करून प्रत्येक वर्गात दोन-दोन तासिका घेतल्या.


सहयोगातून सत्कर्म


पौगंडावस्थेतील मुलांसाठी शैक्षणिक मूल्यांचे संस्करण
contact@baalprabodhini.org
बाल प्रबोधिनी
© 2025. All rights reserved. Website created by Tejas Laud & Omckar Todaankar


संपर्कासाठी पत्ता
के/ऑ ४०१, पार्ले गंगानिकेतन को-ऑ. हौ. सो. लि., ऑफ २९, सुभाष रोड, विलेपार्ले पूर्व,
मुंबई ४०००५७
संपर्क क्र.
+९१ - ९९८७२६४९४९