संस्थेच्या कार्या विषयी

बाल प्रबोधिनी ही नोंदणीकृत संस्था मुंबई येथून १५ जून २००९ पासून कार्यान्वित करण्यात आली. ‘आम्हाला भावी पिढी घडवायची आहे’ हेच उद्दिष्ट समोर ठेवून संस्थेने कार्याचा श्रीगणेशा केला. कोणत्याही शालेय विषयांना हात न लावता ' 'कसं शिकायचं ' याची नजर विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यामुळे हा अभ्यासक्रम राज्य, केंद्र, IB ICSE किंवा CBSE वा इतर कोणत्याही बोर्डाच्या शाळेत पूरक ठरतो. ज्ञान देणारी अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. पण ते ' कसं घ्यावं ' हे सांगणारं मात्र कुणीच नाही. ‘बाल प्रबोधिनी’चं नेमकं हेच कार्य आहे. ‘अभ्यास कर’ असं सगळेच सांगतात पण ‘अभ्यास कसा कर’ हे बाल प्रबोधिनी सांगते. विद्यार्थ्यांसाठी हे कार्य विनामूल्य केले जाते.

कार्य प्रणाली :

संस्थेचं कार्य चार स्तरांवर चालतं

१. शालेय कामकाज : संपूर्ण एक शैक्षणिक वर्ष ‘अध्ययन कौशल्य’ हा उपक्रम सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी घेतला जातो. शैक्षणिक विकासासाठी यात नियोजन, एकाग्रता, श्रवण, वाचन, लेखन या पंचसूत्री मार्फत सखोल मार्गदर्शन केले जाते आणि व्यक्तिमतव विकासासाठी अवलोकन या सूत्राची ओळख करून दिली जाते. प्रत्येक आठवड्याला ३० मिनिटांच्या एका तासिकेची वेळ आणि वार मुख्याध्यापकांशी विचार विनिमय करून निश्चित केला जातो.

२. शिक्षक प्रशिक्षण : समाजाप्रती बांधिलकी आणि भावी पिढीबद्दल कळकळ असलेले स्वयंसेवी शिक्षक यात सहभागी होऊ शकतात. व्यवसायाने शिक्षक असण्याची मुळीच गरज नाही. दोन दिवसीय प्रशिक्षण, दोन दिवसीय कार्यशाळा आणि एक आढावा वर्ग असे प्रशिक्षणाचे स्वरूप असते. शिक्षकांना प्रशिक्षण, अभ्यासक्रमाची हस्तपुस्तिका आणि लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य विनामूल्य दिले जाते.

३. शिबिरांचे आयोजन : इयत्ता दहावीच्या मुलांना शाळेचं अंगण ओलांडून शिक्षणाच्या पुढील पाय-या चढण्यापूर्वी दोन दिवसीय शिबिराचं आयोजन शाळांमधून केले जाते. या मुलांना शैक्षणिक विकास आणि व्यक्तिमत्व विकास याचं मार्गदर्शन केले जाते. या व्यतिरिक्त दूरस्थ शाळा, खेडोपाडी असलेल्या शाळा, अनाथाश्रम अशा ठिकाणी २-३ दिवसीय निवासी शिबिरांचे आयोजन केले जाते.

४. सहयोगातून सत्कार्य : विविध संस्थांमधील विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांना बाल प्रबोधिनीच्या उपक्रमाचे मार्गदर्शन केले जाते. या संस्थांमधील विविध आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि बौध्दिक स्तरावरील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येतो.

आमचे प्रणेते

श्रीयुत चंद्रकांत ठाकूरदास हे बाल प्रबोधिनी संस्थेचे प्रणेते आणि संस्थापक देखील आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण विषयक एक निश्चित नजर प्राप्त होऊन त्यांचा उत्तम शैक्षणिक विकास व्हावा हे प्रयोजन डोळ्यासमोर ठेवून संस्थापकांनी ही संस्था स्थापन केली. ‘ना नफा ना तोटा' या तत्त्वावर या संस्थेची सुरुवात केली आणि आजमितीपर्यंत त्याच पद्धतीने कार्य चालू आहे.

श्रीयुत चंद्रकांत ठाकूरदास, ज्यांना आदरयुक्त प्रेमाने 'भाऊ'या नावाने जग ओळखतं, त्यांनी मनावर ३६ वर्षे अथक संशोधन केलं. त्यातून त्यांना काही ठोस निष्कर्ष हाती आले. सर्व भौतिक सुविधांची रेलचेल असूनही माणूस आनंदी का नाही? या प्रश्नाचे उत्तर आणि त्यावर अचूक उपाय ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या या संशोधनाचे फलित आहे असं म्हणल्यास अतिशयोक्ती नाही. केवळ फलित हाती घेऊन न थांबता त्यांनी ते पडताळून पाहण्यासाठी राजा शिवाजी विद्यालय, दादर, पूर्व या ठिकाणी प्रौढांसाठी विज्ञान प्रबोधिनी १९९५ पासून सुरू केली. ही प्रबोधिनीच्या माध्यमातून माणसांच्या मनाच्या विविध अवस्था दाखविणारी एक प्रयोगशाळाच त्यांच्या समोर आली. आपल्या संशोधन कार्यातून हाती आलेले निष्कर्ष कोणताही पडदा न ठेवता त्यांनी समाजासमोर मांडले. ज्याची जशी अवस्था तशी त्याची गरज. आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडत गेलं. अल्पावधीतच लोक आनंदी जीवनाची वाटचाल करू लागले. या प्रबोधिनीत सर्व स्तरामधील, विविध कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीची पार्श्वभूमी असलेल्या आबालवृद्ध व्यक्तींचा समावेश होता. या विभिन्नतेमध्ये आनंदी मनाची अवस्था हा एक समान धागा होता. हे सर्व पाहून परमपूज्य भाऊंना जाणवलं की कोणत्याही वयाच्या टप्प्यावर व्यक्ती मनाच्या या विज्ञानाच्या आधारावर आमूलाग्र बदलू शकते. त्यामुळे त्यांनी असा विचार केला की जर हे विज्ञानमन तयार होणाऱ्या वयाच्या टप्प्यावर दिलं गेलं तर व्यक्तीची जडणघडण निश्चितच उत्तम होईल. अर्थात असा टप्पा म्हणजे पौगंडावस्था. कारण याच काळात शारीरिक,बौद्धिक आणि मानसिक वृध्दीचा वेग प्रचंड असतो. तेव्हा याच वळणावर जर उत्तम विचार आणि संस्कारांची शिदोरी मिळाली तर प्रत्येक विद्यार्थी भविष्यात एक उत्तम व्यक्ती घडेल. मनाच्या विज्ञानाच्या पायावर आधारित त्यांनी बाल प्रबोधिनी हा एक नाविन्यपूर्ण आणि शैक्षणिक दृष्ट्या परिपूर्ण असा उपक्रम तयार केला.

संस्थेचं यश

विद्यार्थ्यांची लक्षणीय प्रगती, मुलांच्या वागण्यात सकारात्मक बदल, शालेय विषय कसे शिकायचे याविषयीची निश्चित नजर विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली आहे. मुलांची अभ्यासात वाढलेली रुचि हे मुख्याध्यापक आणि शाळांमधील शिक्षकांच्या निदर्शनास आलं. उपक्रमास पालकांचीही पसंती मिळाली. बाल प्रबोधिनीच्या तासिकेची विद्यार्थ्यांनी आतुरतेनं वाट पहाणं, पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही या असा आग्रह धरणं, हे सर्वात मोठं प्रशास्तिपत्रक बाल प्रबोधिनीला मिळालेलं आहे.

संस्थेची कार्यपद्धती

शैक्षणिक विकास

२००९ पासून आजमितीपर्यंत अनेक शाळांमधून हा उपक्रम राबविण्यात आला आहे

स्वयंसेवी शिक्षक प्रशिक्षण

२००९ पासून आजमितीपर्यंत साडे तीनशे पेक्षा अधिक व्यक्तींना स्वयंपूर्ण शिक्षक प्रशिक्षण देण्यात आले

व्यक्तिमत्व विकास
२००९ पासून आजमितीपर्यंत अनेक शाळा, दूरस्थ शाळा, अनाथाश्रम यांमध्ये हा उपक्रम दिला गेला आहे
फलश्रुति

२००९ पासून आजमितीपर्यंत ७५,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे